Rohini Khadse : “महिलांच्या बाबतीमध्ये जर कोणीही आक्षेपार्ह विधान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई ही व्हायलाच हवी. पण शोकांतिका मला एवढी इथे वाटते की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत—जशा आपल्या भारतासाठी लढणाऱ्या कुस्तीपटू महिलांना दोन-दोन महिने तिथे उपोषण करावं लागतं, त्यांना न्याय मागण्यासाठी उपोषण करावं लागतं, तरी कारवाई होताना दिसत नाही. अशा अनेक घटना मला सांगता येतील. महिलांवरती अत्याचार होतात, महिलांवरती बलात्कार होतात, त्याही वेळेस महिलांना संघर्ष करावा लागतो. अशा घटनांना देखील सरकार महत्त्व देत नाहीये. पण या केसमध्ये गुन्हा नोंद झाला, त्याबाबतीत आनंद आहे; पण कारवाई लवकर व्हावी ही अपेक्षा आहे.”
रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात! ( Rohini Khadse )
“विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकार किती विचार करतंय, याच्यावरती आता मला खरंच प्रश्नचिन्ह उपस्थित करावासा वाटतोय. शाळा बघितल्या तर जिल्हा परिषदेच्या शाळा सरकार बंद करण्याचं काम करतंय. शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेही सरकार गंभीर असल्याचं दिसत नाही. एमपीएससी, यूपीएससी या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला घोळ बघायला मिळतोय, पेपर लीक होण्याचं प्रमाण मोठं आहे.
वर्षानुवर्षे अभ्यास करणारे गोरगरिबांच्या घरातले विद्यार्थी, ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना केवळ कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी झटत असतात; अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य वेशीवर टांगण्याचे काम सरकार करत आहे. काही विद्यार्थ्यांनी हताश होऊन आत्महत्या देखील केलेल्या आहेत, ज्याला सरकारच जबाबदार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी पळपुटेपणा करतंय. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा, ही विरोधक व विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. सरकार त्यांना पाठीशी घालतंय, विद्यार्थ्यांना कुठेही सहानुभूती दाखवत नाही.”
हेही वाचा : आधी वेळ मागणारे गिरीश महाजन आता म्हणतात ‘मागण्या अवास्तव’! जरांगेंच्या आंदोलनाने सरकारची कोंडी?
रस्त्यांची दुर्दशा, खड्डे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अनास्था
“खड्ड्यांमुळे सध्या महाराष्ट्रात पूल कोसळत आहेत, खड्डे पडले आहेत. दोन महिने झाले तरी रस्त्यांची कामे नीट झालेली नाहीत. हे सरकारचं ‘उत्कृष्ट’ कारभार आपल्याला बघायला मिळतोय. अशा परिस्थितीत जर विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर मी आधीच म्हटलंय हे ‘मायबाप सरकार’ नाही, हे ‘जीवघेणं सरकार’ आहे. या जीवघेण्या सरकारकडून विद्यार्थ्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात? सरकार त्यांचा जीव जाईपर्यंत परीक्षा घेतंय का, असा प्रश्न पडतो. सरकारने हा निर्लज्जपणा थांबवावा अशी आमची विनंती आहे.”
जळगाव जिल्ह्यातील अवैध दारू, गुटखा आणि ड्रग्जचा सुळसुळाट
“प्रशासनाच्या आणि सरकारच्या सहकार्यानेच हे सर्व सुरू असेल, नाहीतर हे शक्य कसं आहे? कुठल्या कानाकोपऱ्यात गुटखा किंवा दारू विकली जाते, हे पोलिसांना माहिती नसेल का? पन्नीची दारू, मटक्याची दारू या सगळ्या गोष्टींची मी स्वतः वारंवार फोन करून माहिती दिली आहे. दारूमुळे ३०-३० वर्षांचे तरुण मुले मृत्युमुखी पडत आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, लहान मुले अनाथ होत आहेत.
पैसा कमवायला इतर भरपूर ठिकाणे आहेत, रस्त्यांची-पुलांची कामे खोदून तिथे पाहिजे तेवढा मलिदा खा; पण गोरगरिबांच्या जीवाशी खेळू नका. अवैध दारू, गुटखा, गांजा पूर्णपणे बंद व्हावा हीच आमची मागणी आहे. परंतु, प्रशासन यात सामील असल्यासारखे वाटते.”
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil )
“गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे आणि त्यांच्यासोबत अनेक लोक बसलेले आहेत. सरकारने काही मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांच्या उर्वरित काय मागण्या आहेत यावर सरकारने थेट चर्चा करून तोडगा काढणे गरजेचे आहे. चर्चेला सरकार का घाबरतंय किंवा पळपुटेपणा का करतंय?
कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी जेव्हा आंदोलनाला बसतो, तेव्हा त्यांच्या काही भावना आणि रास्त मागण्या असतात; त्या सरकारने ऐकून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या कायदेशीर मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, मात्र हे करत असताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.”








