Jalgaon Crime News : जळगावमध्ये गुन्हेगारीचा थरार! किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून! स्कुटीच्या सीटखाली ड्रग्जचा काळा धंदा! मुंबई ते जळगाव ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश! तब्बल सव्वा कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त! आणि भुसावळमध्ये ३५ लाखांची सुपारी देत तिहेरी हत्याकांडाचा कट! पाच शार्प शूटर्स, खुनाचा प्लॅन आणि गुन्हेगारीचं धक्कादायक जाळं! एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे! जळगाव जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय की नाही? पाहूयात जळगावमधील गुन्हेगारीच्या थरारक बातम्या!
जळगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी चिंता (Jalgaon Crime News)
जळगाव… केवळ एका जिल्ह्याचं नाव नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि अर्थकारणाला दिशा देणारं एक शक्तिपीठ आहे. ज्या जिल्ह्याने राज्याला मातब्बर मंत्री दिले, दिग्गज राजकारणी दिले आणि सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात राहिल्या, त्याच जळगावच्या मातीतून आज रक्ताचा आणि दहशतीचा वास येऊ लागला आहे. गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीचा (Jalgaon Crime) आलेख ज्या गतीने वर गेला आहे, तो पाहिला तर सर्वसामान्य जळगावकराच्या मनात एकच धडकी भरवणारा प्रश्न निर्माण होतोय, की शांत समजलं जाणारं जळगाव आता खरोखरच गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललंय का? दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, गोळीबार, नशेसाठी होणारे चाकूचे वार, खंडणीसाठी होणारी अपहरणे आणि दुसरीकडे महामार्गांवर रक्ताचे सडे सांडणारे भीषण अपघात, या सगळ्या चक्रव्यूहात जळगाव जिल्हा पुरता अडकला आहे. जेव्हा राज्याचे वजनदार मंत्री आणि नेते मुंबईत सत्तेची गणिते मांडत असतात, नेमक्या त्याच वेळी जळगावच्या गल्लीबोळात आणि महामार्गांवर कायदा व सुव्यवस्थेचे लचके तोडले जात आहेत. हा केवळ योगायोग नाही, तर ही प्रशासकीय उदासिनता आणि गुन्हेगारीला मिळालेल्या छुप्या राजाश्रयाची भयंकर परिणती आहे. कोट्यावधी रुपयांचं ड्रग्स, अमली पदार्थ जळगावात येतंय तरुणाई उध्वस्थ होतेय ? यावर पोलिसांचा अंकुश नाही का ? कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे हा खेळ ?
हेही वाचा : जळगावात दसऱ्याच्या रात्री हत्या! चॉपर हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
किरकोळ वादातून हत्या; शहरातील हिंसक घटनांचा आढावा (Jalgaon Murder Case)
सुरुवातीपासून सुरु करूया… गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात घडलेल्या प्रत्येक केसकडे नजर टाकली, तर गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे याची प्रचिती येते. अगदी काही दिवसांपूर्वीच जळगाव शहरातल्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत माऊली नगर परिसरात घडलेली घटना कायद्याच्या चिंधड्या उडवणारी आहे. दुचाकीच्या हेडलाईट चालू-बंद करण्यासारख्या क्षुल्लक, अगदी बालिश कारणावरून वाद सुरू होतो आणि अवघ्या १९ वर्षांचा एक तरुण मयूर जाधव नावाचा मुलगा कमरेला खोचलेला धारदार चॉपर काढतो आणि किरण विठ्ठल पाटील नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीवर सपासप वार करतो. किरण पाटील यांचा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू होतो. ही घटना केवळ एका हत्येची नाही, तर जळगावच्या तरुणाईमध्ये किती भयंकर हिंसेची प्रवृत्ती वाढली आहे आणि त्यांच्याकडे धारदार शस्त्रे किती सहज उपलब्ध होत आहेत, याचं ते जळजळीत उदाहरण आहे.
ह्येच्या पुढे जाऊन जळगावच्या जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजता घडलेला थरार, बॉलीवूडच्या क्राईम सिनेमालाही मागे टाकणारा होता. भरचौकात, जिथे पोलिसांची गस्त असणं अपेक्षित असतं, तिथे प्रेमसंबंधाच्या वादातून एका ३५ वर्षीय महिलेवर दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी गोळीबार केला. गोळी महिलेच्या डाव्या पायाला लागली, ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. भरवस्तीत आणि बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी गोळ्या चालवण्यापर्यंत गुन्हेगारांची हिंमत होते, कारण त्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही. जळगावात आता गावठी कट्टे आणि पिस्तुलं मिळणं इतकं सोपं झालं आहे की, वैयक्तिक वाद मिटवण्यासाठी थेट बंदुकांचा वापर केला जात आहे.
भुसावळमधील कथित सुपारी कटामुळे खळबळ (Bhusawal Crime)
या गुन्हेगारीच्या टोकाची परिसीमा म्हणजे भुसावळमध्ये उघडकीस आलेला ३५ लाखांच्या सुपारीचा आणि तिहेरी हत्याकांडाचा कट. स्थानिक गुन्हे शाखेने वेळेत पावले उचलली नसती, तर भुसावळ रक्ताने न्हाऊन निघालं असतं. विरोधी टोळीचा कायमचा काटा काढण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी देऊन परराज्यातून आणि ठाण्यासारख्या ठिकाणांवरून शार्प शूटर्स जळगावात बोलावण्यात आले होते. खुशहाल गजानन बोरसे, संदीप लोंढे, राणू उर्फ ओमकार भद्रगे या अट्टल गुन्हेगारांना जेव्हा पोलिसांनी ४ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि ६२ ग्रॅम घातक एमडी ड्रग्जसह पकडलं, तेव्हा जळगावमधील Organized Crime किती खोलवर रुजली आहे, हे समोर आलं. भुसावळ आणि जळगाव परिसरातल्या जुन्या गँगवारची पाळेमुळे अजूनही जिवंत आहेत आणि राजकीय वरदहस्ताशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि ड्रग्ज जिल्ह्यात येऊच शकत नाहीत, हा जळगावकरांचा उघड आरोप आहे.
शहरात ड्रग्ज आणि नशेचा विळखा इतका भयानक झाला आहे की, शहराजवळच्या खेडी गावाजवळ केवळ नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून ४५ वर्षीय भंगार व्यावसायिकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला गेला. नशेखोर तरुणांना पैसे नाकारले की थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो, ही जळगावची आजची भीषण वास्तवता आहे. माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे एका अवघ्या १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जनस्थळी बेवारस सोडून देण्यात आले होते. ती चिमुकली मुंग्यांच्या विळख्यात रडत पडली होती, पण सुदैवाने एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले. ही घटना जळगावमधील सामाजिक आणि नैतिक अधःपतनाचा आलेख आहे….
हेही वाचा : जामनेरमध्ये मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; तीन मुलांचे पितृछत्र हरपले
एमडी ड्रग्ज आणि अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न (Jalgaon Drug Seizure)
THE TIMES OF INDIA च्या वेगवेगळ्या वृत्तानुसार केवळ दोन मोठ्या गुन्ह्यांतून ६५ कोटी ७० लाख , मुंबई पोलिसांच्या कारवाईत १.२२ कोटी, स्थानिक गुन्हे शाखेकडून ११.१७ लाख आणि १.८६ कोटींचा गांजा अशी एकूण सुमारे ६८ ते ६९ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांवर कारवाई करण्यात आलीये…. हे ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणांत येतात कुठून ?
या सगळ्या हिंसेच्या बरोबरीनेच जळगावात आर्थिक गुन्हेगारी आणि अपहरणांचे जाळेही तितकेच पसरले आहे. दीपेश कमलेश रुपाणी नावाच्या एका ठगाने ‘हर्बल लाईफ’ कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने जळगावकरांना तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचा गंडा घातला. हा ठग वर्षभर पोलिसांना चकवा देत फरार होता, शेवटी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळताना थरारक पाठलाग करून अटक केली. सर्वसामान्य माणसाची कष्टाची कमाई अशा प्रकारे लुटली जात आहे आणि दुसरीकडे खंडणीसाठी व्यापाऱ्यांच्या कुटुंबांना धमकावण्याचे सत्र सुरू आहे. जामनेरच्या फत्तेपूर हद्दीत युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी यांनी महिलांवर अत्याचार करून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण परिसरात निर्माण केलेली दहशत ही जळगाव जिल्ह्याला लागलेला मोठा कलंक आहे.
आता वळूयात जळगावच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या मृत्यूच्या सापळ्याकडे, म्हणजेच जिल्ह्यातील रस्ते आणि महामार्ग. जळगाव-धुळे हायवे, पाळधी-तरसोद बायपास, आणि भुसावळ रस्ता… हे रस्ते नसून यमाचे दूत बनले आहेत, जिथे दर आठवड्याला भीषण अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील रेूल्वे उड्डाणपुलावर काम सुरू असताना थेट एक मोठी क्रेन खाली कोसळली आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. महामार्गांच्या रस्ते कामांमधील निष्काळजीपणा, अर्धवट सोडलेली कामे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि कंत्राटदारांची मुजोरी यामुळे हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. या अपघातांना जितकी रस्ते कामांमधील त्रुटी कारणीभूत आहे, तितकंच वाहतूक पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि वसुलीबाजी कारणीभूत असल्याचा थेट आरोप वाहनचालक करतात. महामार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या, चुकीच्या बाजूने वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलीस केवळ नाक्यांवर वसुली करण्यात मग्न असतात. वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर आणि ओव्हरलोड वाहने राजरोसपणे या महामार्गांवरून धावतात, कारण त्यांना राजकीय आणि प्रशासकीय अभय असते. हे ओव्हरलोड डंपर रात्रीच्या वेळी वेगात धावताना लहान वाहनांना चिरडून निघून जातात आणि पोलीस केवळ पंचनामे करण्यात धन्यता मानतात. जळगाव धुळे हायवेवर दर तिसऱ्या दिवशी एका कुटुंबाचा आधार हिरावला जातोय, पण नेत्यांच्या गाड्यांना असलेल्या व्हीआयपी सुरक्षेमुळे त्यांना या सर्वसामान्यांच्या रक्ताची किंमत कळत नाहीये.
गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष (Jalgaon Law and Order)
मग प्रश्न उभा राहतो की, जळगाव जिल्ह्यात एवढे मोठे मोठे मंत्री, दिग्गज राजकारणी आणि वजनदार नेते असताना हे काय चाललंय? जळगाव जिल्ह्याला नेहमीच राज्याच्या सत्तेत मानाचे स्थान मिळाले आहे. आज घडीलाही जिल्ह्याचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांवर आहेत. पण दुर्दैवाने, या मंत्र्यांचे आणि नेत्यांचे संपूर्ण लक्ष केवळ स्वतःचे राजकीय वर्चस्व टिकवणे, आगामी निवडणुकांची गणिते मांडणे आणि आपल्या कार्यकर्त्यांना कंत्राटे मिळवून देणे यावरच केंद्रित आहे का ? कि जिल्ह्यातील गुन्हेगारीला (Jalgaon Crime) यांचा आशीर्वाद आहे ? जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर राजकीय नेत्यांचा प्रचंड दबाव आहे असं नागरिकांचा सूर आहे….
या राजकीय हस्तक्षेपामुळेच जळगावातील वाळू माफिया, अवैध सट्टा चालक, गांजा आणि एमडी ड्रग्जचे तस्कर मोकाट फिरत आहेत. प्रत्येक अवैध धंद्यामागे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा किंवा त्याच्या खास कार्यकर्त्याचा हात असतो, हे जळगावात खुलं गुपित आहे. गुन्हेगारांना मिळणारे हेच राजकीय संरक्षण जळगावच्या गुन्हेगारीचा आलेख १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. तरुणांमध्ये वाढलेली बेरोजगारी आणि सहज पैसा कमावण्याची हाव, त्यातच मिळणारी अंमली पदार्थांची साथ यामुळे जळगावची शांत संस्कृती आता भाईगिरी आणि गँगवारकडे झुकू लागली आहे.
जरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या काही दिवसांत क्रिमिनल डोशियर मोहीम राबवून ५२ हून अधिक गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत तुरुंगात टाकले असले आणि शेकडो गुन्हेगारांना तडीपार केले असले, तरी मूळ पाळेमुळे उखडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. जोपर्यंत राजकारणी गुन्हेगारांच्या डोक्यावरून आपला हात काढत नाहीत आणि पोलीस दलाला मुक्तहस्त देत नाहीत, तोपर्यंत जळगाव सुरक्षित होऊ शकत नाही. जळगावचा हा वाढता गुन्हेगारीचा आणि अपघातांचा आलेख केवळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नाही, तर तो या मातीचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गज नेत्यांच्या नैतिकतेचे अपयश आहे. जळगाव आता खरोखरच गुन्हेगारीचा अड्डा बनतोय, आणि या अड्ड्याला उद्ध्वस्त करायचे असेल, तर राजकारणाचा गुन्हेगारीकरणाशी असलेला हा अपवित्र युतीचा खेळ थांबवावाच लागेल. नाहीतर जळगाव जळतच राहील….







