Satpuda Custard Apple : सातपुड्याचा रानमेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळांचा हंगाम सुरू झाला असून, नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सीताफळांची आवक वाढू लागली आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सीताफळांच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या किरकोळ बाजारात सीताफळांची (Custard Apple) विक्री सुमारे १०० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे.
सातपुड्यातील रानसीताफळांना बाजारात मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सीताफळाची अनेक झाडे आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या रानमेव्याची बाजारपेठेत आवक सुरू होते. सातपुड्यातील सीताफळे चविष्ट असल्याने त्यांना ग्राहकांकडून पसंती मिळते. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील व्यापारी सीताफळ खरेदीसाठी सातपुड्याच्या परिसरात दाखल होत आहेत.
स्थानिक बाजारपेठांमध्येही सीताफळे विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या हंगामामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधवांना फळे गोळा करणे, त्यांची विक्री करणे आणि वाहतुकीशी संबंधित कामांमधून तात्पुरता रोजगार मिळत आहे.
हेही वाचा : खान्देशात नवरात्रीचा रंग काही औरच! देवीच्या जागरणापासून गरबा-दांडियापर्यंत, अशी आहे खास परंपरा
वाहतूक खर्चामुळे दरात वाढ (Satpuda Custard Apple)
सातपुड्याच्या डोंगराळ भागातून सीताफळे गोळा करून ती सपाटीच्या भागातील बाजारपेठांपर्यंत आणण्यासाठी विक्रेत्यांना वाहतूक भाडे आणि डिझेलवर खर्च करावा लागतो. त्यामुळे सध्या मिळत असलेला १०० रुपये प्रतिकिलोचा दरही तुलनेने कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
सातपुड्याचा हा रानमेवा स्थानिक बाजारपेठांसह राज्यातील इतर भागांतही मागणी मिळवत आहे. यंदा दरात झालेली वाढ आणि बाजारपेठेतील मागणी यामुळे सीताफळ हंगामाकडे आदिवासी बांधवांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.








