जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Operation Tiger 3.0 : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपद आणि ‘ऑपरेशन टायगर 3.0’च्या चर्चेला पुन्हा उधाण आले असताना, शिवसेना शिंदे गटाचे राज्य संघटक प्रमुख आनंद परांजपे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना कार्यकर्त्यांची असणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, लोकशाहीमध्ये आकड्यांना अधिक महत्त्व असल्याचेही परांजपे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ( Eknath Shinde Chief Minister )
सध्या महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत. “कार्यकर्ता म्हणून माझीही भावना आहे की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे. त्यामुळे अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही व्यक्त केली आहे,” असे परांजपे म्हणाले.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर 3.0’बाबत विचारले असता परांजपे यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. “ऑपरेशन टायगर होत आहे, असे मीडियाला कुणी सांगत नाही. जेव्हा ते होईल, तेव्हा मीडियाला कळेल,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी या चर्चेचा सस्पेन्स कायम ठेवला. ‘ऑपरेशन टायगर 3.0’बाबत यापूर्वीही राज्याच्या राजकारणात विविध दावे आणि चर्चा झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर 3.0’च्या माध्यमातून आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे का, असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर “नाही, असे काही नाही,” असे परांजपे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याच उद्देशाने शिवसेनेचा संघटनात्मक दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : जरांगे यांच्या आंदोलनावर 1400 कोटींच्या कंत्राटाचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
‘ऑपरेशन टायगर 3.0’बाबत आनंद परांजपेंनी काय म्हटलं? ( Operation Tiger 3.0 )
उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक आढाव्यासाठी हा दौरा सुरू असल्याची माहितीही परांजपे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक, धुळे आणि नंदुरबारनंतर जळगाव येथे बैठक घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पदाधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत संघटनेतील नियुक्त्या तसेच स्थानिक अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही संघटनात्मक तयारीला महत्त्व दिले जात असल्याचे परांजपे यांनी सांगितले. पक्षाने या निवडणुका स्वबळावर लढवायच्या की महायुतीच्या माध्यमातून, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे वरिष्ठांच्या आदेशानुसार याबाबत निर्णय घेतील, असेही परांजपे म्हणाले. सध्या मात्र निवडणुकीच्या समीकरणांपेक्षा संघटना मजबूत करण्यावर भर असून, कार्यकर्त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








