जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Ganpati E-Bike : जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात जय जगदंबा मित्र मंडळाच्या गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी मंडळाने अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करत पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, गणपती बाप्पाची मूर्ती ई-बाईकवर विराजमान करून आगमन मिरवणूक काढण्यात आली.
मंडळाच्या या आगळ्या उपक्रमातून ‘इंधन बचाव, देश बचाव’ असा महत्त्वपूर्ण संदेश नागरिकांना देण्यात आला. पेट्रोल-डिझेलचा वाढता वापर, प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ई-बाईकचा वापर करण्यात आला. गणरायाच्या आगमन सोहळ्यातून सामाजिक संदेश देण्याचा मंडळाचा हा प्रयत्न परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषात स्वागत ( Jalgaon Ganeshotsav 2026 )
गणरायाच्या आगमनावेळी परिसरात ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. बाप्पाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
गणरायाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ई-बाईकवर विराजमान असलेल्या बाप्पाची मूर्ती मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरली. नागरिकांनी या अनोख्या संकल्पनेचे कौतुक करत मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा : जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा जयघोष
आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
या आगमन सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, नगरसेवक सागर सोनवणे यांच्यासह जय जगदंबा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाचे स्वागत करण्यात आले.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि बाप्पाच्या जयघोषामुळे कांचन नगर परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.
‘इंधन बचाव, देश बचाव’चा सामाजिक संदेश ( Jalgaon Ganpati E-Bike )
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जय जगदंबा मित्र मंडळाने ई-बाईकचा वापर केला. इंधनाची बचत करण्यासोबतच प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
परंपरेसोबत आधुनिकतेची सांगड घालत जय जगदंबा मित्र मंडळाने केलेले गणरायाचे हे आगळेवेगळे आगमन जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. गणरायाच्या आगमनाने कांचन नगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी गणेशोत्सवासाठी नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.








