Jalgaon Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे… जल्लोषाची तयारी सुरू झाली असतानाच जळगाव जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवासाठी काही महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. विशेषतः डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या आवाजाबाबत प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. डीजेवर बंदी नाही, मात्र आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सवाचा जल्लोष करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवाच्या आधी जळगाव प्रशासनाचा मोठा इशारा ( Jalgaon Ganeshotsav 2026 )
गणेशोत्सव पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तयारी केली आहे. जळगाव शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला नॉईज मीटर देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान मंडळांच्या ध्वनीपातळीची प्रत्यक्ष पाहणी आणि मोजमाप करणं पोलिसांना शक्य होणार आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध क्षेत्रांसाठी आवाजाच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंडळांनी डीजे किंवा इतर वाद्यांचा वापर करताना या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या समन्वयकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. विशेषतः ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घेत, निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज आढळल्यास संबंधित गणेश मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : अमळनेर-पारोळ्यात पावसाने पाठ फिरवली अन् पिके करपू लागली! ‘कोरडा दुष्काळसदृश’ जाहीर करण्याची मागणी
DJ वाजवायचा असेल तर नियमांचे भान ठेवा ( DJ Noise Limit Jalgaon )
जळगाव जिल्ह्यात डीजे तसेच इतर वाद्यांच्या आवाजासाठी निर्धारित मर्यादा लागू आहेत. त्यामुळे ‘डीजे वाजणार की नाही?’ हा प्रश्न नसून, ‘तो नियमांच्या चौकटीत वाजणार का?’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. ध्वनिमापक यंत्रांच्या माध्यमातून आवाजाची मोजणी केली जाणार असून, नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. प्रशासनाने याबाबत गणेश मंडळांना स्पष्ट इशारा दिला आहे.
आता गणेश मंडळांसमोर आव्हान आहे ते उत्सवाचा उत्साह कायम ठेवत नियमांचं भान राखण्याचं. कारण यंदा पोलिसांकडे नॉईज मीटर आहे आणि आवाजाची मर्यादा ओलांडली, तर कारवाईही निश्चित आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा जल्लोष करा… पण आवाजाच्या मर्यादेत राहूनच !







