जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Ganeshotsav : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना जळगाव शहरातील नवी पेठ परिसरात एका गणेश मंडळावर मोठे संकट ओढावले. जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल सहा महिन्यांपूर्वी बऱ्हाणपूर येथे गणेशमूर्ती बुक केली होती. दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात ही मूर्ती जळगावात दाखल झाली. मात्र, प्रतिष्ठापनेपूर्वीच मूर्ती खंडित होत असल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेशमूर्तीवर साज चढवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी मूर्ती ओली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मूर्तीचा काही भाग हळूहळू तुटत असल्याचे दिसून आले. पाहता पाहता मूर्ती अधिक खंडित होऊ लागल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली.
प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय ( Jalgaon Ganeshotsav )
गणेशमूर्तीची अवस्था पाहता अशा स्थितीत तिची प्रतिष्ठापना करणे योग्य ठरणार नसल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी आणि इतर कार्यकर्त्यांनी चर्चा करून मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच बाप्पाला निरोप देण्याची वेळ आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये भावुक वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा : गणेशोत्सवात DJ वाजणार की कारवाई होणार? जळगाव पोलिसांकडे नॉईज मीटर; मंडळांना प्रशासनाचा इशारा
क्रेनच्या सहाय्याने मेहरूण तलावात विसर्जन
त्यानंतर गणेशमूर्ती क्रेनच्या सहाय्याने मेहरूण तलावापर्यंत नेण्यात आली. डोळ्यांत अश्रू आणि मनात बाप्पाच्या आठवणी घेऊन जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण वातावरणात मूर्तीचे विसर्जन केले. ज्या बाप्पाची सहा महिन्यांपासून मंडळाचे कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते, त्याच बाप्पाला प्रतिष्ठापनेपूर्वीच निरोप द्यावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मूर्तिकारावर कारवाईची मागणी ( Jalgaon Ganesh Idol Broken )
दरम्यान, गणेशमूर्ती खंडित झाल्याप्रकरणी संबंधित मूर्तिकाराची चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही गणेशभक्तांकडून करण्यात आली आहे. मूर्ती नेमकी कोणत्या कारणामुळे ओली झाली आणि खंडित होण्यामागे काय कारण आहे, याबाबत सविस्तर तपास होणे आवश्यक असल्याची मागणीही करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून, संपूर्ण परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.







