Jalgaon Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवात सामाजिक सलोखा राखण्याचे प्रशासनाचे आवाहन ( Jalgaon Ganeshotsav 2026 )
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच सर्व समाजघटकांमध्ये सलोखा आणि शांतता कायम राहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेश मंडळांनी प्रबोधनात्मक आणि जनजागृती करणारे देखावे सादर करावेत. मात्र, कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावतील किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे देखावे, घोषणाबाजी अथवा कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही बैठकीत महत्त्वाचा ठरला. डीजे अथवा ध्वनिक्षेपकाचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक वाढविल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होणार नाही, याची मंडळांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा : जामनेर तालुक्यात पोलिसांचे धडक कॉम्बिंग ऑपरेशन; १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी
रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजवण्याची मंडळांची मागणी ( Jalgaon Ganeshotsav )
दरम्यान, गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध अडीअडचणी आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धारित वेळेनंतर वाद्य वाजविण्यास परवानगी देता येणार नाही, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि जनजागृतीचा संदेश देणारा उत्सव ठरावा, यासाठी मंडळांनी प्रबोधनात्मक उपक्रम राबवावेत, असे सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाटाबाबत मंडळांना आवश्यक माहिती दिली. गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माल्य तलावात न टाकता महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी जमा करावे, असे आवाहन त्यांनी केले. गणेश मंडळांनी प्रशासन आणि महापालिकेला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.








