जळगाव । जितेंद्र कोतवाल
Jalgaon Ganeshotsav: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून गणेश मंडळांना विविध सूचना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: गणेश विसर्जन मिरवणुकीआधी जळगाव प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये; वीज तारा, डीपी अन् खड्ड्यांची पाहणी
डीजेचा आवाज वाढवल्यास कारवाई
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपक आणि डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेतच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने मंडळांना दिल्या आहेत. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी देण्याची मागणी बैठकीत केली. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे अशी परवानगी देता येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले.
प्रबोधनात्मक देखाव्यांचे आवाहन
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गणेश मंडळांना केले. तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि शांतता राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
निर्माल्य निश्चित ठिकाणीच जमा करा
गणेश विसर्जनानंतर निर्माल्य तलावात टाकू नये, यासाठी महापालिका प्रशासनानेही आवाहन केले आहे. मेहरूण तलावातील गणेश घाटावर निर्माल्य न टाकता महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच ते जमा करावे, असे महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी सांगितले. एकूणच, शांतता, शिस्त आणि पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जळगाव प्रशासन सज्ज झाले आहे.








