-जितेंद्र कोतवाल / जळगाव प्रतिनिधी
Jamner Police Combing Operation : जळगाव जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने जामनेर तालुक्यात विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
जामनेर तालुक्यात पोलिसांचे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन ( Jamner Police Combing Operation )
जामनेर, पहूर आणि फत्तेपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत तब्बल १८९ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. यामध्ये जामनेर पोलिसांनी ७२, पहूर पोलिसांनी ६४, तर फत्तेपूर पोलिसांनी ५३ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली.
दरम्यान, कारवाईत १९ दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जामनेर पोलिसांनी ६, पहूर पोलिसांनी १० आणि फत्तेपूर पोलिसांनी ३ दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाया केल्या.
हेही वाचा : खान्देशातून तरुण पुणे-मुंबईकडे नोकरीसाठी का धावतात? रोजगार, पगार आणि करिअरची संधी नेमकी कुठे?
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग ( Jamner Police Operation )
पोलिसांनी याच कारवाईदरम्यान ९ हद्दपार नोटिसा बजावल्या, तर ५ आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय संशयित ५२ मोटारसायकली आणि एका रिक्षेची तपासणी करण्यात आली. या वाहनांची आरटीओ कार्यालयामार्फत तपासणी व पडताळणी करण्यात येणार असून, दोष आढळल्यास संबंधित वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या विशेष मोहिमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथकांनी सहभाग घेतला.








