जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Tribal Women Protest : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी महिला भगिनींच्या आमरण उपोषणाची अखेर प्रशासनाच्या सकारात्मक चर्चेनंतर सांगता झाली आहे. स्वाती कुडाळ आणि स्वाती गायकवाड या दोन्ही महिलांनी आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे आंदोलनस्थळी दाखल ( Jalgaon Tribal Women Protest )
उपोषणाच्या आठव्या दिवशी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. नाशिक येथील विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेण्याबाबतचे पत्र देत मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतःच्या हस्ते सरबत देऊन दोन्ही महिलांचे उपोषण सोडवले. दरम्यान, उपोषणामुळे महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा : गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट; जळगावात आई-मुलाच्या मृत्यूने हळहळ








