Dhule Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या प्रतीकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मात्र, खंडेराव मंदिराजवळ पोलिसांनी ही अंत्ययात्रा रोखली. यावेळी मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा ( Manoj Jarange Patil )
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा समाजाकडून विविध आंदोलने केली जात आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
याच पार्श्वभूमीवर धुळ्यातही मराठा समाज रस्त्यावर उतरला. शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सरकारच्या धोरणाविरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
हेही वाचा : बोदवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपानंतर तणाव; जामठीत तोडफोड आणि जाळपोळ
‘मागण्या मान्य करा, अन्यथा…’
आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला इशारा दिला. “शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या तर सरकारला डोक्यावर घेऊन गुलाल उधळू; अन्यथा सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेवरच गुलाल उधळू,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना रोखून काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मोठ्या संख्येने मराठा समाजाची उपस्थिती ( Dhule Maratha Protest )
या आंदोलनात भानुदास बगदे, विनोद जगताप, दीपक रौंदळ, श्रीरंग जाधव, विकास बाबर, ॲड. दिनेश काळे, भैय्या शिंदे, राकेश भोसले, वीरेंद्र मोरे, अण्णा कदम, संतोष लकडे, सुरेश पवार, उल्हास यादव, भूषण बागुल यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








