LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावच्या महामार्गावर खड्डे, अपघात अन् धोकादायक चौक; प्रशासन झोपलंय का?
जळगाव

जळगावच्या महामार्गावर खड्डे, अपघात अन् धोकादायक चौक; प्रशासन झोपलंय का?

Jalgaon National Highway
110

Jalgaon National Highway : जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग…कुठे जीवघेणे खड्डे, कुठे अपूर्ण रस्त्याचे काम, तर कुठे धोकादायक चौक…वाहतुकीचा वाढता ताण आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा महामार्ग आता नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या वर्षभरात या मार्गावर 500 हून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय…..कालिंका माता चौक असो, आकाशवाणी चौक असो किंवा इच्छादेवी चौक…प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न….अपघातांची मालिका थांबणार कधी?आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे…उड्डाणपूल हवा की अंडरपास?खड्डे बुजवणार कोण?आणि महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर जबाबदार कोण?

जळगावच्या महामार्गावर खड्डे, अपघात अन् धोकादायक चौक ( Jalgaon National Highway )

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही काळापासून अपघातांची मालिका सुरू आहे.वाहतुकीची वाढलेली वर्दळ, धोकादायक चौक, अपुऱ्या वाहतूक सुविधा आणि रस्त्याची खराब अवस्था यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.सुमारे पाच वर्षांपूर्वी खोटेनगर ते कालिंका माता चौक या मार्गाचे काम करण्यात आले.त्यावेळी शिवकॉलनी, आकाशवाणी चौक आणि कालिंका माता चौक येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र उड्डाणपुलाऐवजी चौक आणि सर्कल उभारण्यात आले.आता वाढत्या वाहतुकीमुळे आणि अपघातांमुळे याच चौकांच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कालिंका माता चौक हा सध्या जळगावच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.या चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने आता तांत्रिक पाहणी सुरू केली आहे.अंडरपास करायचा की ओव्हरब्रिज उभारायचा?

या दोन्ही पर्यायांचा अभ्यास करून डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणजेच, ज्या चौकावर काही वर्षांपूर्वी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्कल उभारण्यात आले, त्याच ठिकाणी आता मोठ्या वाहतूक उपाययोजनेची गरज निर्माण झाली आहे.

पण प्रश्न फक्त चौकांचा नाही… खड्ड्यांचाही आहे!जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.इच्छादेवी चौक ते शिवकॉलनी परिसरात साडेचारशेहून अधिक खड्डे असल्याचा दावा करण्यात आला आहे.विशेषतः इच्छादेवी चौकातील मोठा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
रस्त्यावरून जाताना अचानक खड्डा समोर आल्यामुळे वाहनाचा ताबा सुटण्याची शक्यता असते.दुचाकीस्वारांसाठी तर हा धोका आणखी गंभीर ठरतोय .

लोकप्रतिनिधी स्वखर्चाने खड्डे बुजवणार ( Jalgaon Road Accident )

प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लोकप्रतिनिधी मैदानात उतरलेयत …खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे तक्रारी आणि निवेदने करण्यात आली. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. हे राजकीय श्रेयासाठी नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष कोणताही असो… जनहिताचा मुद्दा महत्त्वाचा….राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर यापूर्वीही निवेदने आणि आंदोलने झाली आहेत. मात्र आता लोकप्रतिनिधी स्वखर्चाने खड्डे बुजवण्यासाठी पुढे आले आहेत. जनतेच्या हितासाठी चांगले काम करणाऱ्यांचे पक्षभेद विसरून कौतुक झाले पाहिजे, अशी भूमिका संग्रामसिंग सूर्यवंशी पाटील यांनी घेतली.

हेही वाचा : मेहरूण तलावात सांडपाणी; गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर

महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह ( Jalgaon National Highway )

महामार्गाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय… आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा…महामार्गाच्या कामाची गुणवत्ता. जळगाव-धुळे महामार्गाचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात आले. मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान नसल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी म्हटले आहे. डीपीआरनुसार काम झाले का? काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुरुस्तीची वेळ का आली? आणि अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची बाजू मांडली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणं ही समस्या केवळ जळगावपुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.
मात्र जळगावच्या रस्त्यांवरील खड्डे पाहता प्रश्न असा आहे… काम नेमकं कुठे सुरू आहे..आणि जळगावकरांना खड्ड्यांपासून कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार?

जळगावच्या महामार्गाचा प्रश्न फक्त खड्डे बुजवण्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे…रस्त्याच्या गुणवत्तेचा…वाहतूक नियोजनाचा…चौकांच्या सुरक्षिततेचा…आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा. अंडरपास होईल की ओव्हरब्रिज? खड्डे कायमचे बुजतील की काही दिवसांनी पुन्हा रस्ता उखडेल? महामार्गाच्या कामाची गुणवत्ता सुधारेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाच्या पुढील कृतीतूनच मिळणार आहेत.पण तोपर्यंत सर्वात मोठा सवाल कायम आहे… या महामार्गावर आणखी किती अपघात झाल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार? जळगावच्या नागरिकांना सुरक्षित रस्ता कधी मिळणार?

कालिंका माता चौकात अंडरपास की ओव्हरब्रिज?

जळगावच्या महामार्गाचा प्रश्न फक्त खड्डे बुजवण्यापुरता मर्यादित नाही…हा प्रश्न आहे रस्त्याच्या गुणवत्तेचा…वाहतूक नियोजनाचा…चौकांच्या सुरक्षिततेचा…आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक नागरिकाच्या जीवित सुरक्षेचा.एका बाजूला अंडरपास आणि ओव्हरब्रिजच्या चर्चा सुरू आहेत…दुसऱ्या बाजूला खड्डे बुजवण्याचे दावे केले जात आहेत…मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर अजूनही जीवघेणे खड्डे आहेत आणि अपघातांचा धोका कायम आहे.

आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी टेपच्या सहाय्याने मोजलेले खड्डे केवळ रस्त्यावरील खड्डे नाहीत…तर ते प्रशासनाच्या नियोजनातील आणि कामाच्या गुणवत्तेतील त्रुटींचीही खोली दाखवतात. प्रश्न फक्त एवढाच आहे…जळगावकरांना सुरक्षित रस्ता मिळण्यासाठी आणखी किती अपघातांची वाट पाहावी लागणार? खड्डे मोजण्याची वेळ नागरिकांवर आणि पत्रकारांवर येणार की कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा स्वीकारणार? निर्णय प्रशासनाला घ्यायचा आहे…कारण प्रत्येक खड्ड्यामागे एका नागरिकाचा जीव धोक्यात आहे.

Jalgaon Road Accident : प्रत्येक खड्डा बुजवता येतो…पण त्या खड्ड्यात गेलेला जीव परत आणता येत नाही.त्यामुळे प्रश्न फक्त रस्त्याच्या दुरुस्तीचा नाही…प्रश्न आहे, जळगावकरांच्या सुरक्षित प्रवासाचा. आता प्रशासन खड्डे बुजवतंय की या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post