जितेंद्र कोतवाल । जळगाव प्रतिनिधी
Raver assault case : सोशल मीडियावर नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची आणि पतीला फोटो दाखवण्याची धमकी देऊन एका ३३ वर्षीय विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रावेर शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडली घटना? ( Raver assault case )
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील एका भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी आरोपीने बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपी शेख जाकीर शेख हुसेन (वय ३८, रा. बंडू चौक जवळ, रावेर, जि. जळगाव) याने पीडित महिलेस “तुझे नग्न अवस्थेतील फोटो तुझ्या पतीला दाखवेन व सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी थेट धमकी दिली. या धमकीच्या जोरावर फिर्यादीचा विरोध असतानाही आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला.
पतीला लोखंडी पाईपने मारहाण
अत्याचाराची घटना घडत असतानाच या प्रकरणातील साक्षीदार अचानक घरात आला. हे पाहून घाबरलेल्या आरोपीने साक्षीदारास आणि फिर्यादीच्या पतीला घरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पतीला जबर मारहाण करून दुखापत केली.
हेही वाचा : तापी नदीत प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचे मृतदेह! पायांना साखळी अन् कुलूप; गूढ वाढलं
पाठलाग करून शरीरसुखाची मागणी
फक्त एवढ्यावरच न थांबता, पीडित महिला ज्या ज्या रस्त्याने येत-जात असे, त्या त्या वेळी आरोपी तिचा पाठलाग (स्टॉकिंग) करायचा. तसेच वेळोवेळी तिच्याकडे शरीरसुखाची बेकायदेशीर मागणी करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. अखेर आरोपीच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली व तक्रार नोंदवली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Raver police case )
पीडितेच्या फिर्यादीवरून १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री रावेर पोलीस ठाण्यात आरोपी शेख जाकीर शेख हुसेन याच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्र. ४७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ७५(२), ७८(२), ११८(१), आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप निपाणे यांनी रावेर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) हरिदास बोचरे हे करत आहेत. घटनेनंतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे रावेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.








