Malegaon Dongrale Case : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका अमानुष घटनेचा अखेर निकाल लागलाय. साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विजय खैरनारला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमूळे संपूर्ण महाराष्ट्र संतापाने उसळले होते. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्यानं केली जात होती. अखेर या प्रकरणात न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. जाणून घेऊया…
डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा ( Malegaon Dongrale Case )
एका निष्पाप चिमुरडीचं आयुष्य संपवणाऱ्या या घटनेनं डोंगराळे गावासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं. २४ वर्षीय विजय खैरनार यानं साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली. या प्रकरणाची सुनावणी फास्ट्रॅक्ट न्यायालयात सुरू होती. न्यायालयानं आरोपीला अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या आरोपांखाली दोषी ठरवलं. या गुन्ह्याची क्रूरता लक्षात घेता आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी गावकरी आणि पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
१६ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेनं राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी विजय खैरनारला अटक केली. त्यानंतर तपासाला गती देत अवघ्या तीन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले होते. गेल्या दहा महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा : धुळ्यात जगन्नाथ पुरी मंदिराची प्रतिकृती; दर्शनासाठी गर्दी
विजय खैरनारला कोणत्या गुन्ह्यांसाठी शिक्षा? ( Vijay Khairnar )
या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी मांडली. राज्य सरकारनं त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी पक्षानं न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण २४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ॲड. निकम यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केलं. हा गुन्हा अत्यंत क्रूर असून दुर्मीळातील दुर्मीळ श्रेणीत मोडतो, हा मुद्दा सरकारी पक्षानं न्यायालयासमोर मांडला. पीडितेचे वकील आणि तिच्या वडिलांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला.








