LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शेतकऱ्यांना दिवाळी साठी फक्त ५ हजारांची मदत? ५ हजारांत सण साजरा होणार कसा? फडणवीसांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह!
खान्देश

शेतकऱ्यांना दिवाळी साठी फक्त ५ हजारांची मदत? ५ हजारांत सण साजरा होणार कसा? फडणवीसांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह!

Farmer Relief Maharashtra
Farmer Relief Maharashtra : ना आभाळातून बरसणाऱ्या सरी, ना जमिनीच्या कुशीत ओलावा… पाण्याविना तहानलेली धरती आणि संकटात सापडलेला बळीराजा अशी स्थिती आता निर्माण झाली आहे…. पावसाअभावी नदी, नाले, धरण आणि तलावाने तळ गाठले असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे…… दुष्काळाच्या झळा आता पिण्याच्या पाण्यापर्यंत…भीषण पाणीटंचाईचा धोका…..

अश्यातच, दुष्काळानं शेतकऱ्यांचं उभं पीक हिरावून घेतलं… कर्जाचा डोंगर डोक्यावर, हातातोंडाशी आलेला घास मातीमोल आणि आता दिवाळी तोंडावर! अशा संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा होती. मात्र, दिवाळीपूर्वी केवळ पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मदतीचा फुंकर घातला की त्यांच्या संकटाची थट्टा केली, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.

मुख्यमंत्र्यांची पाच हजारांची मदत; शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?

बँकेचं कर्ज, सावकाराकडून घेतलेले पैसे आणि शेतीसाठी केलेला खर्च… या सगळ्याचा हिशेब चुकता करायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मराठवाडा आणि विदर्भातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. प्रशासनाला पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले, केंद्राच्या पथकानंही नुकसानीचा आढावा घेतला. दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; पण प्रत्यक्ष मदतीची घोषणा झाली ती अवघ्या पाच हजार रुपयांची!

दुष्काळानं शेती उद्ध्वस्त झाली, उत्पन्नाचा स्रोत आटला आणि घरखर्च भागवणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत शेतकरी कुटुंबानं दिवाळी साजरी करायची तरी कशी? कपडे, किराणा, फराळ आणि इतर खर्च भागवायचे कसे? महागाईनं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असताना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी ही मदत पुरेशी आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय. मदतीच्या घोषणेचा गाजावाजा मोठा; पण शेतकऱ्यांच्या हातात पडणारी रक्कम मात्र तुटपुंजी असल्याची भावना व्यक्त होतेय.

हेही वाचा : एका रिक्षाच्या प्रवासाने हिरावलं १६ वर्षांच्या अर्जुनचं आयुष्य; जबाबदार कोण?

दिवाळीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर आव्हान ( Maharashtra Drought )

मुख्यमंत्र्यांच्या पाच हजार रुपयांच्या मदतघोषणेवर शेतकरी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केलीय. दुष्काळानं पिकं जळाली, खर्च बुडाला आणि कर्ज फेडण्याची चिंता वाढली. अशा वेळी पाच हजार रुपये देऊन सरकार नेमकं कोणतं संकट दूर करणार, असा सवाल शेतकरी नेत्यांनी उपस्थित केलाय. नुकसान मोठं आणि मदत मात्र अत्यल्प, अशी टीका करत सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोपही केला जातोय.

दिवाळीचा सण आनंदाचा; पण यंदा अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात चिंता आणि निराशेचं सावट आहे. एका बाजूला महागाईचा भडका, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळामुळे हातातून गेलेलं पीक! अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत सण साजरा करायचा की कर्जाची चिंता करायची, हा प्रश्न बळीराजाला सतावतोय. सरकार शेतकऱ्यांचं असल्याचं सांगितलं जातं; मग संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देताना हात आखडता का घेतला जातोय? एखाद्या मंत्र्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं पाच हजार रुपयांत दिवाळी साजरी करून दाखवावी, असं आव्हान देत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. आता सरकार या नाराजीची दखल घेऊन मदतीची रक्कम वाढवणार का, की बळीराजाची दिवाळी यंदाही संकटातच जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post