जळगाव । जितेंद्र कोतवाल
Jalgaon Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या (Jalgaon Ganesh Visarjan) पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समिती, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी संभाव्य अडथळे आणि समस्या दूर करण्याबाबत संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा: जळगावात ‘शाडू’चा नवा ट्रेंड; ‘या’ गणेशमूर्तींना मिळत आहे यंदा मोठी मागणी
शिवतीर्थ मैदान येथून या पाहणीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्य बाजारपेठेसह विसर्जन मिरवणुकीच्या (Ganesh Visarjan 2026) नियोजित मार्गाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण कंपनी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
वीज तारा, डीपी आणि खड्ड्यांची पाहणी
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील विविध समस्यांची पाहणी करण्यात आली. महावितरण कंपनीच्या विद्युत तारा, उघड्यावर असलेले डीपी, रस्त्यांवरील खड्डे तसेच इतर संभाव्य अडथळ्यांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली.
मिरवणुकीच्या मार्गावर आढळलेल्या समस्या तातडीने दूर करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेश मंडळांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजनावरही चर्चा करण्यात आली.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी
गणेश विसर्जन मिरवणुकीला (Jalgaon Ganesh Visarjan 2026) दरवर्षी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन, गर्दीवर नियंत्रण आणि संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळे वेळेत दूर करून प्रशासनाकडून गणेश विसर्जनासाठी शहर सज्ज करण्याचे काम सुरू आहे.


