जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Ganpati Visarjan : जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आज उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात सुरुवात झाली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. जळगाव शहरातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपतीपासून करण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही महानगरपालिकेच्या गणपतीला पहिला मान देण्यात आला.
आरतीनंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची मिरवणूक मार्गस्थ झाली. महानगरपालिकेचा हा मानाचा गणपती केळीच्या लगद्यापासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले.
जळगावच्या मानाच्या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ ( Jalgaon Ganpati Visarjan )
या सोहळ्याला महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान महापौरांसह उपस्थित महिलांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. तर महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत गणरायाला उत्साहात निरोप दिला.
महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर आता शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका त्यापाठोपाठ मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे शहरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांगतेला सुरुवात करताना मानाच्या गणपतीला दिलेला हा पहिला मान आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेले भक्तिमय वातावरण विशेष ठरले आहे.
हेही वाचा : जळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य; मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे स्वागत








