Jalgaon District Bank Election 2026: राज्याच्या सत्तेत एकत्र… राजकीय व्यासपीठावर एकत्र… सरकार चालवताना एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले महायुतीचे घटकपक्ष… पण जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र याच मित्रपक्षांच्या जागावाटपाचं गणित काही केल्या जुळताना दिसत नाहीये… भाजप आणि शिवसेनेला युती हवीय, राष्ट्रवादी काँग्रेसलाही महायुतीसोबतच निवडणूक लढवण्याची इच्छा आहे…
मात्र राष्ट्रवादीने थेट सात जागांची मागणी पुढे केल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झालाय… सन्मानजनक जागा मिळाल्या तरच सोबत राहणार, अन्यथा वेगळा विचार करण्याचे संकेतही दिले जातायत… त्यातच आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं राजकीय वातावरण आणखी तापलंय… त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची मोट बांधली जाणार की जागांच्या गणितातच मित्रपक्षांची वाट वेगळी होणार?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीसमोर जागावाटपाचे आव्हान (Jalgaon District Bank Election 2026)
राष्ट्रवादी काँग्रेसने आता जागावाटपाच्या चर्चेत आपली भूमिका स्पष्ट केलीय… केवळ युतीसाठी युती नको, तर सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आमदार अनिल पाटील (Anil Patil MLA) यांनी मांडलीय… महायुतीच्या माध्यमातून सात जागांची अपेक्षा असून, या मागणीवर राष्ट्रवादी ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय… विशेष म्हणजे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील एकत्र बसल्यानंतरच पुढील दिशा निश्चित होईल, असंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केलंय… मंगेश चव्हाण यांच्याशीही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय… मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करण्याचा पर्यायही खुला असल्याचं त्यांनी म्हटलंय…
दुसरीकडे, युतीच्या चर्चांना वेगळाच रंग चढलाय तो सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जामुळे… आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केलाय… मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी या आरोपावर मिश्किल प्रतिक्रिया दिलीय… गिरीश महाजन हे नेहमीच संकटातून मार्ग काढतात, त्यामुळे ते यावरही योग्य तो मार्ग काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय… शिवाय आपण दोघेही सोबत असून युती होण्याचे संकेतही त्यांनी दिलेत…
हेही वाचा : जळगाव गुन्हेगारीचा अड्डा बनतंय? हत्या, ड्रग्ज आणि सुपारीच्या कटाने खळबळ!
गुलाबराव पाटील यांची अर्ज बाद होण्यावर प्रतिक्रिया
म्हणजेच, एका बाजूला सात जागांचा आग्रह, दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांमधील जागावाटपाची चर्चा आणि त्यात सुमित पाटील यांच्या अर्जावरून निर्माण झालेला वाद… जिल्हा बँकेच्या निवडणुकीने जळगावच्या राजकारणात नवी समीकरणं तयार केली आहेत… आता गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सात जागांच्या मागणीवर तोडगा निघतो का? की जागावाटपावरून महायुतीतील घटकपक्ष स्वतंत्र वाटचाल करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय… मात्र या युतीच्या चर्चेदरम्यानच सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा मुद्दाही समोर आलाय… या अर्जाबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं सांगत, अर्ज बाद होण्यामागे तांत्रिक चूक असण्याची शक्यता महाजन यांनी व्यक्त केलीय… त्यामुळे एकीकडे युतीसाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अर्ज बाद होण्याच्या मुद्द्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय…







