Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का? शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मोफत वीज योजनेवरही कात्री लागणार का? आणि दुष्काळासाठी सरकारला आता आणखी कर्ज काढावं लागणार का? कारण महाराष्ट्रावर तब्बल 11 लाख कोटींच्या आसपास कर्जाचा भार आहे आणि या कर्जाचं व्याज फेडण्यासाठीच हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे सरकारने आता लाडकी बहीणसह तब्बल 26 योजनांचा फेरआढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे… नेमकं सरकारच्या मनात काय आहे, आणि कोणत्या योजनांवर संकटाचं सावट आहे?
लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का? ( Ladki Bahin Yojana Latest Update )
महाराष्ट्र सरकारसमोर आता एकीकडे दुष्काळाचं मोठं संकट आहे… तर दुसरीकडे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. महाराष्ट्रावर सध्या तब्बल 11 लाख कोटी रुपयांच्या आसपास कर्जाचा भार आहे. आणि या कर्जाचं केवळ व्याज फेडण्यासाठी 2026-27 मध्ये तब्बल 70 हजार 55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकारच्या तिजोरीवरचा खर्च वाढतोय…
आणि आता त्यात दुष्काळासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.
राज्यात यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे. सरकारने 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना मदत, पाणी, चारा आणि पीक नुकसानभरपाईसाठी मोठ्या निधीची गरज आहे. आणि याच वेळी सरकारसमोर दुसरं मोठं आव्हान आहे…
लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि इतर कल्याणकारी योजनांवर मोठा खर्च होत आहे. फक्त लाडकी बहीण योजनेचाच विचार केला, तर 2026-27 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 26 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणूनच आता सरकारकडून योजनांचा फेरआढावा आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
म्हणजे योजना बंद होणार आहेत का? इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे… सध्या सरकारने या योजना तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालेलं नाही. त्याऐवजी कोणती योजना किती प्रभावी आहे? त्याचा लाभ खरंच गरजूंपर्यंत पोहोचतोय का? सरकारी पैशाचा योग्य वापर होतोय का? आणि एखाद्या योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत त्याचा फायदा किती होतोय? याचा अभ्यास केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचंही स्वतंत्र मूल्यांकन होणार आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेवर सुमारे 78 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं वृत्त आहे. आता योजनेचा प्रत्यक्ष परिणाम, लाभार्थ्यांना मिळणारा फायदा आणि निधीचा वापर याचा आढावा घेतला जाणार आहे.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ऑगस्टचा ₹1500 हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात
महाराष्ट्रावर ₹11 लाख कोटींच्या कर्जाचा भार किती?
आणखी महत्त्वाचं म्हणजे… फक्त लाडकी बहीणच नाही, तर सरकारच्या 26 महत्त्वाच्या योजना आणि 25 धोरणांचंही मूल्यांकन केलं जाणार आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफीसह इतर अनेक योजनांचा समावेश आहे. पण सरकारचा फोकस फक्त खर्च कमी करण्यावर नाही… सरकारी योजनांमध्ये होणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठीही आता अधिक लक्ष दिलं जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांवर देखरेख वाढवली जाणार आहे. योजनांची प्रगती तपासली जाणार आहे.आणि कामाचा डॅशबोर्ड आणि तिमाही अहवाल मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सादर करण्यावर भर दिला जाणार आहे.
म्हणजेच…पैसा कुठे खर्च होतोय?किती खर्च होतोय?आणि त्याचा फायदा कुणाला होतोय?यावर सरकारची नजर असणार आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न…दुष्काळासाठी आणखी निधी लागणार…शेतकऱ्यांना मदत द्यावी लागणार…कर्जमाफी आणि मोफत वीज यांसारख्या योजनांचा खर्च आहे…लाडकी बहीण योजनेचाही मोठा आर्थिक भार आहे…आणि दुसरीकडे राज्याच्या कर्जावर हजारो कोटी रुपयांचं व्याज फेडावं लागत आहे. त्यामुळे सरकारसमोर आता दोन पर्याय आहेत…एकतर आणखी कर्ज उभारून दुष्काळाचा सामना करायचा…किंवा…सरकारी योजनांचा फेरआढावा घेऊन कुठे खर्च कमी करता येईल, कुठे बदल करता येईल आणि कुठे पैसा वाचवता येईल, हे ठरवायचं.
फेरआढावा म्हणजे योजना बंद होणार का? ( Ladki Bahin Yojana )
आणि म्हणूनच सध्या चर्चेत आलंय ते म्हणजे…लाडकी बहीण योजना बंद होणार का? शेतकरी कर्जमाफीवर परिणाम होणार का? मोफत वीज योजनेत बदल होणार का? कारण या योजना बंद करण्याचा थेट निर्णय जाहीर झालेला नाही.
पण…सरकार आता प्रत्येक रुपयाचा हिशोब तपासणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे. दुष्काळाचं संकट किती वाढतं…सरकारला किती निधीची गरज भासते…आणि या योजनांच्या मूल्यांकनातून काय निष्कर्ष समोर येतात…यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे. म्हणजेच… लाडकी बहीण योजनेवर थेट कात्री लागली नसली, तरी सरकारच्या आर्थिक परिस्थितीमुळे या योजनेसह अनेक योजनांवर आता ‘फेरआढाव्याची तलवार’ नक्कीच आहे.







