- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गुलाबराव पाटील, सुमित पाटील आणि गिरीश महाजन यांच्या निवडीबाबत महत्त्वाच्या घडामोडी.
-
बिनविरोध निवडीसाठी राजकीय गटांमध्ये सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी आणि राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष.
जितेंद्र कोतवाल :
Jalgaon Politics 2026 : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेष म्हणजे, महायुतीतील समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनंतर काही उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
(Jalgaon Bank Election News)
गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड
जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तिन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. महायुतीतील युतीधर्म पाळण्याच्या दृष्टीने भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती आहे. त्यानुसार जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी माघार घेतली. तर कुलभूषण पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. (Maharashtra Cooperative Bank Election)
सुमित पाटील यांचाही मार्ग मोकळा
पाचोरा विकास मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपचे सतीश परशराम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सतीश शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात सुमित पाटील यांच्याविरोधात कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार उरलेला नाही. परिणामी, त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या कुटुंबासाठी ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. (Unopposed Election Jalgaon)
गिरीश महाजन यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. या निर्णयाला त्यांनी आव्हान देत नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली.
मात्र, तेथेही त्यांची हरकत फेटाळण्यात आली. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तुकाराम विठोबा निकम यांनी आपला अर्ज मागे घेतला. तसेच आपण गिरीशभाऊ यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया देत त्यांनी गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्याविरोधात कोणताही उमेदवार शिल्लक राहिला नाही. परिणामी, त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Maharashtra Cooperative Bank Election)
जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा समन्वय चर्चेत
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील, सुमित पाटील आणि गिरीश महाजन यांच्या मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. काही ठिकाणी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनंतर उमेदवारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा समन्वय कितपत प्रभावी ठरतो, हे या घडामोडींमधून दिसून येत आहे.
आता जिल्हा बँकेच्या इतर मतदारसंघांमध्ये कोण उमेदवारी कायम ठेवणार आणि कुठे माघारी होणार, याकडे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक किती मतदारसंघांत होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीतच संघर्ष! 21 जागांचं गणित काय?








