Vehagi Village Nandurbar : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम वेहगी (बारीपाडा) गावातील पक्का रस्ता, सुक नदीवरील पूल आणि मोबाईल नेटवर्कचा प्रश्न गंभीर बनला आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असून, २१ ऑगस्ट रोजी उपचारासाठी वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन देत रस्ता, पूल आणि मोबाईल टॉवरच्या मागणीसाठी २१ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वेहगी येथील माहेरची व ओहवा येथील सासरची २३ वर्षीय महिला २१ ऑगस्ट रोजी आजारी पडली. तिला छाती व पोटात वेदना होऊ लागल्याने तातडीने उपचाराची गरज होती. मात्र, गावात पक्का रस्ता नसणे, सुक नदीवर पूल नसणे आणि मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे आपत्कालीन मदत मिळविण्यात अडथळे निर्माण झाले. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकल्याने ग्रामस्थांनी महिलेला बांबूच्या झोळीतून नदीपार नेले. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे तिचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वेहगी गावात पक्का रस्ता आणि सुक नदीवरील पुलाची मागणी ( Vehagi Village Nandurbar )
या घटनेनंतरही गावातील परिस्थिती कायम असल्याचे २६ ऑगस्ट रोजी घडलेल्या आणखी एका घटनेतून समोर आले. वेहगी-बारीपाडा येथील बावीबाई रविंद्र वळवी यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात नेणे आवश्यक होते. मात्र, पक्का रस्ता व सुक नदीवरील पूल नसल्याने खाजगी वाहन गावापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यातच मोबाईल नेटवर्क नसल्याने १०८ रुग्णवाहिकेलाही फोन करता येत नव्हता. अखेर ग्रामस्थांनी बावीबाई वळवी यांना बांबूच्या झोळीच्या सहाय्याने सुक नदी पार करून वेहगी गावाच्या बायपास रस्त्याने गोंडामाळपर्यंत आणले. त्यानंतर खाजगी वाहनाची व्यवस्था करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावातील गर्भवती महिला व रुग्णांच्या जीविताचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Vehagi Bari Pada Nandurbar : वेहगी ग्रामस्थांनी रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. ग्रामस्थांच्या वतीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी तहसीलदार, अक्कलकुवा यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, समस्या सोडविण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून वारंवार केवळ आश्वासने देण्यात आली; मात्र गावाच्या मूलभूत प्रश्नांवर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हेही वाचा : धुळ्यात गुटख्याच्या पुड्या घेऊन शिवसेना उबाठाचे आंदोलन;
गर्भवती महिलेला झोळीतून नदीपार नेण्याची वेळ
२३ वर्षीय महिलेचा रस्ता, पूल आणि नेटवर्कअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने झालेला मृत्यू हा केवळ एक अपघाती प्रकार नसून, “हा मृत्यू प्रशासकीय व्यवस्थेच्या क्रूरतेचे उदाहरण आहे,” अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अशा प्रकारे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वेहगी गावाची लोकसंख्या सुमारे १,८०० असून गावात दोन जिल्हा परिषद शाळा आणि तीन अंगणवाडी केंद्रे आहेत. रस्ता व पुलाअभावी विद्यार्थी, लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत १०८ रुग्णवाहिका, पोलीस किंवा इतर शासकीय यंत्रणांशी संपर्क साधणेही कठीण होत आहे.
२१ दिवसांचा अल्टिमेटम ( Vehagi Village Nandurbar )
वेहगी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्याकडे पक्का रस्ता, सुक नदीवरील पूल आणि मोबाईल टॉवरच्या कामास तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. येत्या २१ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास सुक नदीत सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय निर्णय घेते आणि वेहगी ग्रामस्थांच्या मागण्यांना किती गांभीर्याने घेतले जाते, याकडे अक्कलकुवा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








