Dhule Gutkha News : धुळे जिल्ह्यात गुटखा, सुगंधी तंबाखू, मावा आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची कथितपणे सुरू असलेली विक्री रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गुटख्याच्या पुड्या दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतर गुटखा घेऊन थेट अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दालनात जात संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू, मावा आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला. या अवैध विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, सार्वजनिक आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
गुटखा विक्रीविरोधात पोलिसांकडे निवेदन ( Dhule Gutkha News )
धुळे जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील कथित साखळीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित तपासणी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः तरुण पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
हेही वाचा : Jalgaon Drugs Case | जळगावात ड्रग्जविरोधात LCB ची मोठी कारवाई; ११ लाख १७ हजारांचा
‘कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन’ ( Gutkha Sale in Dhule )
जिल्ह्यातील गुटखा विक्रीच्या कथित नेटवर्कवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाकडून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, निंबा मराठे, भरत मोरे, अण्णा फुलपगारे, दिलीप चित्ते, राजू ढवळे, कुणाल कानकाटे, महिला विभागाच्या अरुणा मोरे, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनिता वाघ, प्रभा परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








