MPSC Paper Leak : नंदुरबारमध्ये एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षण देत, प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाचेच नाव थेट पेपरफुटी प्रकरणात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकाचा काही वर्षांपूर्वी ‘आदर्श शिक्षक’ म्हणून गौरवही करण्यात आला होता. मात्र, आता याच शिक्षकाला एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
नंदुरबार MPSC पेपरफुटी प्रकरणात शिक्षकाला अटक ( MPSC Paper Leak )
नंदुरबारमधील या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यासह अमृत पाटील यांना अटक करण्यात आली आहे. अमृत पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, अमृत पाटील आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीचे नाव थेट पेपरफुटीच्या प्रकरणात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा : टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ;
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात नेमकं काय घडलं? ( MPSC Paper Leak )
एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाचा पेपर लिंक झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नंदुरबारमध्ये कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे पाच जणांना अटक झाल्याची माहिती आहे. ज्या शिक्षकाच्या कामाची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला, त्याच शिक्षकाला आता पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणात अटक का झाली? पेपरफुटीच्या या संपूर्ण रॅकेटमध्ये त्यांची नेमकी भूमिका काय होती? आणि या प्रकरणामागे आणखी कोणकोणाचे कनेक्शन आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येणार आहेत. मात्र, ‘आदर्श शिक्षक’ ते पेपरफुटीतील आरोपी असा समोर आलेला हा प्रवास नंदुरबारच्या शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच धक्कादायक मानला जात आहे.





