Amalner Leopard Attack : सानेनगर परिसरातील बोरी नदीकाठाजवळ बिबट्याने तरुणावर अचानक हल्ला केल्याची थरारक घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या अचानक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि दोन पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली आहे.
योगेश मनोज पाटील हा तरुण गुरे चारण्यासाठी गेलेल्या आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बोरी नदीकाठाजवळ गेला होता. यावेळी झुडपाजवळ बसलेला असताना अचानक मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने योगेशच्या शर्टाला पकडले आणि त्याला मागच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. त्यामुळे योगेश आणि बिबट्यामध्ये काही क्षण अक्षरशः जीवन-मरणाची झुंज सुरू झाली.
बोरी नदीकाठाजवळ बिबट्याने तरुणावर अचानक झडप घातली ( Amalner Leopard Attack )
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे योगेश प्रचंड घाबरला. तरीही त्याने धैर्य दाखवत बिबट्याला ठोसा मारून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा बिबट्यावर काहीही परिणाम झाला नाही. अखेर प्रसंगावधान राखत योगेशने जोरजोरात ‘वाचवा, वाचवा’ अशा आरोळ्या ठोकण्यास सुरुवात केली. आवाज ऐकताच बिबट्याने तेथून धूम ठोकली आणि योगेशचा जीव वाचला.
दरम्यान, त्याच परिसरातून बैलगाडीने जाणाऱ्या व्यक्तीने आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच नागरिकांची गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी यांनी वनरक्षक योगेश पाटील, मनीषा मोरे यांच्यासह वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाठवले. हल्ल्यात जखमी झालेल्या योगेशला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : जळगावात गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; मेहरूण तलावावर १०० हून अधिक कर्मचारी तैनात
बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाची तयारी
बिबट्याच्या उपस्थितीची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली. माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह काही नागरिकांनी हातात काठ्या घेत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाने नागरिकांनी स्वतःहून बिबट्याचा शोध घेण्याऐवजी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
Leopard : बिबट्याला पकडण्यासाठी आता वनविभागाची विशेष तयारी सुरू आहे. वनाधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या परवानगीने परिसरात ट्रॅप कॅमेरे तसेच दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी लहान प्राणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनपाल गुलाब पिंजारी यांनी दिली. बिबट्या पकडल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
या घटनेमुळे बोरी नदीकाठ आणि सानेनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.








