Dhule Laling Toll: धुळे जिल्ह्यातील लळींग टोल नाक्यावर स्थानिक वाहन व्यावसायिकांकडून आकारण्यात येणाऱ्या टोलबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक व्यावसायिकांना टोल आकारणीत पूर्वीप्रमाणे सवलत द्यावी, या मागणीसाठी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली.
यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा: तांबापूर दुमदुमले! ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
स्थानिक वाहनधारकांना आर्थिक भार
संघटनेच्या म्हणण्यानुसार, लळींग टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना सध्या मोठ्या प्रमाणावर टोल भरावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनचालकांवर आर्थिक भार वाढत असल्याची तक्रार आहे.
टोल आकारणीत सवलत
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी स्थानिक तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना टोल आकारणीत सवलत मिळत होती. मात्र, लळींग टोल नाक्यावर नवीन कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक वाहनधारकांना मिळणारी सवलत बंद झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
अचानक सवलत बंद झाल्यामुळे स्थानिक वाहन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे पूर्वीची टोल सवलत तातडीने लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन
निदर्शनांमध्ये धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच अनेक ट्रक व्यावसायिक सहभागी झाले होते. दिनेश चंद्र शर्मा, हरीश विभुते, मांगीलाल चौधरी, प्रमोद पाटील, जगदीश चौधरी, राजेंद्र तीडमे, दिलीप कापसे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्थानिक वाहनधारकांच्या मागणीवर प्रशासन आणि संबंधित टोल यंत्रणा काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


