AI in Education : मान्यवरांकडून एक चांगला संदेश देण्यात आला आहे. “मुझे मारने की कोशिश मत करना, मेरा मोबाईल छीन लेना; मैं अपने आप मर जाऊंगी किंवा मर जाऊंगा,” अशा स्वरूपाची भावना व्यक्त करण्यात आली. सांगायचा मुद्दा असा आहे की, चार जण एकत्र बोलण्यासाठी बसले, तर त्यापैकी एक जण बोलत असतो आणि उर्वरित तीन जण मोबाईलच्या माध्यमातून इतरांशी संवाद साधत असतात. किंवा ते मोबाईलद्वारे दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतात आणि प्रत्यक्षात त्यांचे शरीर मात्र वेगळ्या ठिकाणी उपस्थित असते.
त्यामुळे मोबाईलचा किती फायदा होऊ शकतो आणि त्याचे किती नुकसान होऊ शकते, हे या उदाहरणावरून स्पष्टपणे दिसून येते. एकीकडे सरकारकडून एआयचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. भविष्यात एआयचा वापर अधिक व्यापक होणार आहे. मात्र, त्याचबरोबर एआयचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणेही महत्त्वाचे आहे.
मोबाईलच्या वाढत्या वापरावर आमदार अनिल पाटील यांचे भाष्य ( AI in Education )
एआयचा ( AI ) वापर शिक्षण क्षेत्रातही करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्र तयार होत आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रही मागे राहिलेले नाही. भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर करावा लागणार आहे. हे सत्य असले तरी सध्याच्या परिस्थितीत मोबाईलच्या वाढत्या वापराचे उदाहरण आपल्या समोर आहे. आज मोबाईलमुळे लोक सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. अनेकदा भेटण्यासाठी येणारे लोकही आता मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटांत बोलून आपले काम साध्य करतात. त्यामुळे मोबाईलचा चांगला आणि वाईट परिणाम दोन्ही या माध्यमातून पाहायला मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याला घडवायचे असेल, तर त्याचे पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून त्याला शाळेत पाठवतात. आई-वडील हे केवळ जन्म देण्यापुरते नसतात, तर शिक्षक हा कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्याला घडवत असतो.
ज्ञानाच्या अमावस्येतून आलेला विद्यार्थी ज्याप्रमाणे पौर्णिमेकडे, म्हणजेच उजेडाकडे जात असतो, त्याचप्रमाणे त्याची जडणघडण होत असते. जगातील कोणताही यशस्वी माणूस हा शिक्षकाच्या माध्यमातून घडलेला असतो, हे मात्र सत्य आहे.
विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या, अशा आदर्श शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असेल, तर तोच खरा आदर्श शिक्षक आहे, अशी भावना व्यक्त करत आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे आपले मत मांडले.
हेही वाचा : जळगावात 15 गुणवंत शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरव
आदर्श शिक्षक समाजाभिमुख असावा – अनिल पाटील ( Anil Patil Teacher Speech )
आदर्श शिक्षक हा समाजाभिमुख असला पाहिजे. प्रत्येकासाठी तो आदर्श असला पाहिजे. विद्यार्थी असो किंवा अधिकारी असो, शिक्षक हा आदर्श असेल, तरच तो खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक ठरतो. आज खऱ्या अर्थाने आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला जात आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
मी पालकमंत्र्यांना विनंती करतो की, अशा आदर्श शिक्षकांसाठी २०१७ पासून बंद असलेले मानधन पुन्हा सुरू करावे. तसेच त्यांच्या वेतनातही वाढ करावी.
विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत असताना या शिक्षकांवर शासनाच्या इतर कामांचाही मोठा ताण असतो. त्यामुळे मी शिक्षकांची बाजू घेत नाही, कारण हा शासनाच्या कामाचा भाग आहे. मात्र, शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.



