Dhule News: खानदेशची कुलस्वामिनी म्हणून श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या कानूमातेला धुळेकरांनी दोन दिवसांच्या उत्सवानंतर सोमवारी वाजत-गाजत भक्तीभावाने निरोप दिला. पांझरा नदीच्या विविध ठिकाणी कानूमातेच्या विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी “कानूमाते की जय” आणि “कन्हेर राजा की जय” अशा घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.
धुळे शहरासह जिल्ह्यात शनिवारी मोठ्या उत्साहात कानूमातेची स्थापना करण्यात आली. या उत्सवासाठी परिवारातील सदस्य एकत्र येत पुरणपोळी तसेच विविध पदार्थांचा नैवेद्य कानूमातेला अर्पण करतात. त्यानंतर रात्रभर जागरण, भजन, नृत्य आणि फुगड्यांचा आनंद घेत भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा: मोबाईल आणि iPhoneच्या अतिवापरामुळे मुलांचं काय नुकसान होतं?
रविवारी दिवसभर कानूमातेच्या पूजाअर्चेसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी सकाळी कानूमातेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने कानूमातेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य कुटुंबे आणि भाविक सहभागी झाले होते.
कानूमातेची मूर्ती डोक्यावर घेत भाविकांनी नृत्य करत उत्साह व्यक्त केला. महिला, पुरुष आणि लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने मिरवणुकीत सहभाग घेतला. अखेर भक्तिमय वातावरणात पांझरा नदीपात्रात कानूमातेचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी भाविकांनी चांगला पाऊस पडावा, शेतीला भरभराट मिळावी आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना कानूमातेकडे केली. धुळे शहरासह जिल्ह्यात कानूमातेच्या उत्सवाला शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा उत्सव आजही खानदेशातील श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक एकोप्याचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


