Jalgaon News: रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल उचलण्याच्या प्रयत्नात १९ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धुळ्याकडे शिक्षणासाठी निघालेल्या या तरुणाचा जामदा रेल्वे स्थानकावर अपघात झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तारखेडा (ता. पाचोरा) येथील यश गणेश पाटील हा १९ वर्षीय तरुण अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षातील प्रवेशासाठी धुळ्याला जात होता. घरातून निघताना त्याच्या वडिलांनी त्याला आज प्रवास करू नकोस, आधी शेतातील काम पूर्ण करूया आणि दुसऱ्या दिवशी दोघे मिळून जाऊ, असं सांगितलं होतं.
मात्र, यशने स्वतःच जाऊन येतो असं सांगत घर सोडलं. त्यानंतर घडलेली दुर्घटना त्याच्या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली.
जामदा स्थानकावर काळाचा घाला
यशला त्याच्या वडिलांनी पाचोरा रेल्वे स्थानकापर्यंत सोडलं होतं. तेथून तो सेवाग्राम एक्स्प्रेसने चाळीसगावला पोहोचला. पुढे धुळ्याकडे जाणाऱ्या MEMU लोकलमधून त्याने प्रवास सुरू केला.
जामदा रेल्वे स्थानकावर गाडी थांबत असताना यशच्या हातातून मोबाईल खाली प्लॅटफॉर्मवर पडला. मोबाईल परत मिळवण्याच्या घाईत त्याने चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी त्याचा पाय रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला आणि तो गंभीर जखमी झाला. आसपासच्या नागरिकांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाकडे नेलं. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी घेतला होता नवा लॅपटॉप
यशच्या बॅगेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक कागदपत्रं आढळून आली. त्याच्याकडे पाचोरा ते धुळे प्रवासाचं रेल्वे तिकीटही मिळालं.
विशेष म्हणजे, शिक्षणासाठी वडिलांनी यशला अवघ्या एक दिवस आधी सुमारे ५० हजार रुपयांचा नवीन लॅपटॉप घेऊन दिला होता. शिक्षणासाठी मोठी स्वप्नं पाहणाऱ्या मुलाचा अशा पद्धतीने अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोबाईलसाठी चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न किती जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.
