जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Maharashtra Drought Relief : राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या भागात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे किंवा २५ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर ( Maharashtra Drought Relief )
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या पंचनामे सुरू आहेत. दहा दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आणि निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
गेल्यावेळीही एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. यावेळीही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. यंदा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून वाहून गेल्या, तर यावर्षी पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : जळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य; मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे स्वागत
कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठे नुकसान
कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत संवेदनशील असून, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही. त्यांना तातडीने मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन-तीन तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. त्या भागात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्यात आली असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.








